ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ…

 

भल्या पहाटे झोपेतून उठलायेस का कधी

डोंगरावर आलेली सोनेरी किनार पाहिलीयेस का कधी

त्या मखमली छताखाली हात पसरवून उभा राहून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।१।

 

शिवनेरीच्या शिवमंदिराचा साज पाहिलास का कधी

कडेलोट कड्याच्या थरार अनुभवलाय का कधी

त्या शिवमंदिरी एकदा नतमस्तक होऊन बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।२।

 

राजगडाची अभेद्यता पाहिलीस का कधी

बालेकिल्ल्यावर जाताना उर भरलाय का कधी

सुवेळाच्या नेढ्यामध्ये चार क्षण सुखाने बसून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।३।

 

रायगडाची श्रीमंती मोजलीस का कधी

राजसभेतल्या शिवगर्जनेनं अंग शहारलंय का कधी

त्या वाघांना मानाचा मुजरा करून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।४।

 

प्रतापगडचा प्रताप ऐकलयेस का कधी

बुरुजावरचा शाही भगवा पाहिलास का कधी

आई भवानीचं तेज डोळ्यामध्ये साठवून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।५।

 

कळसूबाई चं शिखर खुणावलंय का कधी

उंचच उंच जाण्याचा विचार केलाय का कधी

पायाशी लोळण घेणारे ढग एकदा अनुभवून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।६।

 

 

 

 

निसर्गाची किमया कोकणकडा पाहिलास का कधी

जिवंतपणी स्वर्गसुख अनुभवलस का कधी

नळीच्या वाटेने एकदा हरिश्चंद्रावर जाऊन बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।७।

 

यशवंतीची निष्ठा वाचलीयेस का कधी

तानाजीची लगीनघाई पाहिलीस का कधी

एकदा तरी सिंहगड पायी चढून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।८।

 

मोकळ्या आभाळात ताऱ्यांची कुजबुज ऐकलीस का कधी

कोणीही नसताना त्या ध्रुवाची साथ दिलीस का कधी

काळ्याकुट्ट अंधारात स्वतःचा रस्ता शोधून बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।९।

 

 

 

 

स्वतःच्या आयुष्यात स्वतः साठी वेळ काढलास का कधी

चौकटीच्या बाहेरचं जग पाहिलस का कधी

या वीकएंड ला एकातरी ट्रेकला जाऊन बघ

मग तुला कळेल…

ट्रेकिंग म्हणजे काय रे भाऊ… ।१0।

 

-प्रतिकराज😊